Shirur Crime : शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट! ‘घोडा संस्कृती’मुळे नागरिक भयभीत; पोलिसांचा धाक संपलाय का?
Shirur Crime : 'घोडा संस्कृती' नावाखाली फोफावली गुंडगिरी; व्यापाऱ्यांकडून वसुली आणि मारहाणीच्या प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर.

Shirur Crime – शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल चोरी आणि विद्युत रोहित्र चोरीच्या सत्रासह शहरात वाढलेली ‘घोडा संस्कृती’ आणि चैन स्नॅचिंगच्या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने शिरूर पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्याच्या बेट भागात विद्युत मोटार आणि केबल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. नागरिकांनी चोरांबाबत माहिती आणि पुरावे देऊनही पोलीस आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. या चोरीच्या घटनांमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर शेतीचा वीजपुरवठाही खंडित होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे, भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढल्याने महिला वर्गातही भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात सध्या ‘घोडा संस्कृती’ नावाने ओळखली जाणारी गुंडगिरी फोफावली असून, तरुणांची टोळकी सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवताना दिसत आहेत. किरकोळ कारणावरून मारहाण करणे आणि व्यापाऱ्यांकडून वसुली करणे असे प्रकार सर्रास घडत असून पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र आहे. गस्त वाढवणे आणि संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या परिस्थितीत तातडीने लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“विद्युत पंप व केबल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या चोरीचा उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
– दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक, टाकळी हाजी दूरक्षेत्र





