Junnar Koyta Gang : जुन्नरमध्येही कोयता गँग सक्रिय! बाजारपेठेत धारदार हत्यारे नाचवून दहशत माजवण्याचा प्रयत्न
Junnar Koyta Gang : जुन्नर शहरात मंगळवारी सकाळी पाच ते सहा जणांनी घोळका करून आरडाओरडा करीत लोखंडी धारदार कोयते, रॉड यासारखी हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Junnar Koyta Gang – जुन्नर शहरातील निवासी बाजारपेठ असलेल्या सदाबाजार पेठेत मंगळवारी (दि.२) सकाळी दहाच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घोळका करून आरडाओरडा करीत लोखंडी धारदार कोयते, रॉड यासारखी हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीनंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अरबाज हमीद हलवाई, इरफान माजिद हलवाई, शायरा माजीद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई, मोहसीन इकबाल आतार आणि एक अल्पवयीन (सर्वजण राह. सदाबाजारपेठ, जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार कैलास केंद्रे यांनी फिर्याद नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास इरफान याच्या दुकानासमोर अरबाज आणि एक अल्पवयीन मुलगा हातामध्ये धारदार कोयते घेऊन अंगावर धावून जात होते.
तर, इरफान व इतर काही जण लोखंडी रॉड हातात घेऊन दहशत माजवीत होते. यावेळी ते सर्वजण आरडाओरडा, शिवीगाळ करीत दहशत निर्माण करीत होते. जुन्नर पोलिसांनी आरोपी इरफानला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर हिले पुढील तपास करीत आहे.
तातडीने अन् कठोर कारवाई करावी
जुन्नर शहरात बाजारपेठेत भरदिवसा कोयता, रॉड दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याने येथील नागरिक, महिला, व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यामध्ये घडलेल्या प्रकारामुळे असुरक्षिततेचे वातावरण बनले असून जुन्नर शहरात प्रथमच असे गंभीर प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.





