Junnar Court Verdict: शासकीय कामात अडथळा पडला महागात! दोघांना १ वर्षाचा कारावास…नेमकं प्रकरण काय?
Junnar Court Verdict: तपासाच्या कारणावरून पोलिसांशी घातला होता वाद; पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही होता आरोप.

Junnar Court Verdict- पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकारी व अंमलदारांना शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिंपरी पेंढार येथील वृषाली विजय कुटे आणि विजय कोंडीभाऊ कुटे यांना जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाचा साधा कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी 29 सप्टेंबर 2026 रोजी हा निकाल दिला. 2 ऑगस्ट 2023 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वृषाली कुटे आणि विजय कुटे हे आळेफाटा पोलीस ठाण्यात आले होते. वृषाली कुटे यांच्या भावाच्या अपघातप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना, आरोपी प्रतीक शंकर हाडवळे याची पिकअप गाडी पोलिसांनी त्यांच्या परवानगीशिवाय कशी सोडली,
असा जाब विचारत त्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित आरोपी आणि त्याची गाडी पोलीस ठाण्यात हजर करण्याची मागणी करत दोघांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच महिला पोलीस कर्मचारी दिघे आणि फटांगरे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याचा आरोप होता.
विजय कुटे हा पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोलची बाटली घेऊन आला आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील जी. के. खोडे यांनी कामकाज पाहिले. सुनावणीदरम्यान साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील संबंधित न्यायनिवाड्यांचे दाखले सादर करण्यात आले. उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम 353 अन्वये दोषी ठरविले.





