Dhom Dam: धोम डावा कालवा धोक्याच्या छायेत! कधीही घडू शकते मोठी दुर्घटना; अधिकारी कधी जागे होणार?
Dhom Dam: अस्तरीकरणाला पडलेली भगदाडे आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे धोम डावा कालवा फुटण्याची शक्यता; भुईंज परिसरातील शेतकरी दहशतीखाली.

Dhom Dam – वाई तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या धोम डाव्या कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी कालवा फुटण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कालव्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती होणे अपेक्षित असताना संबंधित धोम पाटबंधारे विभागाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे.
धोम धरणाच्या पाण्यावर तालुक्यातील मोठ्या क्षेत्रातील शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्यांच्या अस्तरीकरणाला तडे जाणे, काही ठिकाणी भगदाडे पडणे, झाडाझुडपांचे वाढलेले प्रमाण तसेच कालव्यांच्या संरक्षक कामांकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याच्या प्रवाहाच्या काळात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही कालवे फुटण्याच्या घटना घडून शेतजमिनींचे नुकसान झाले असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
कालव्यांची नियमित पाहणी करून संभाव्य धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करणे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी असताना, प्रत्यक्षात परिस्थितीकडे गांधारीची भूमिका घेतल्याप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे. कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी शेतात घुसल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या कार्यपद्धतीबाबतही शेतकरी वर्गातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही शेतकर्यांकडून अधिकार्यांवर अनियमिततेचे आरोप केले जात असले तरी, त्याबाबत अधिकृत पातळीवर स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप न राहता कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.



