Indapur News : नवजात अर्भक ओढ्यात बेवारस अवस्थेत आढळले; स्थानिक नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
Indapur News : इंदापूर तालुक्यातील उद्धट गावच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Indapur News : इंदापूर तालुक्यातील उद्धट गावच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक ते दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक ओढ्यातील गवतामध्ये बेवारस अवस्थेत आढळून आले. १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Indapur News)
अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक सुभाष इंगोले यांनी ओढ्यात जाऊन पाहणी केली असता गवतामध्ये हे नवजात अर्भक आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अर्भकाला उचलून स्वतःच्या कपड्यांमध्ये गुंडाळले आणि उपचारासाठी बारामती येथे नेले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे नवजात बाळाला वेळीच मदत मिळाली. (Indapur News)
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी अर्भकाला शासकीय महिला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Indapur News)
दरम्यान, जन्मानंतर नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्भकाला अशा अवस्थेत सोडून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन तपास पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयांमधील माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Indapur News)





