मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी केल्या प्रकरणी ‘लय भारी’ यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला अटक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले होते. तर या प्रकरणात त्यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल केला आहे. आता या प्रकरणात त्यांची वारंवार बदनामी करण्याचा आरोप असलेला ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार उर्फ तात्यासो आबाजी खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी, जयकुमार गोरे यांनी निकालाची प्रत माध्यमांसमोर दाखवली होती. जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल नष्ट करण्याचे आदेश कोर्टाने त्याचवेळी दिले होते. आता या प्रकरणात पुन्हा आरोप झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि पत्रकार खरात यांच्यावर हक्कभंग देखील आणला होता.
ही अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली ते माण खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. सर्व मिडियाही त्यांच्या पाठीशी राहील, ही अपेक्षा!’, असेही ते म्हणाले.
काय आहेत मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप ?
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेल्या फोटा पाठवल्याच्या प्रकरणावरुन गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्या महिलेला अद्याप त्रास देत असल्याचा आरोपही गोरेंवर केला जात आहे. मी त्या महिलेला त्रास देतोय की नाही या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. जो कोण दोषी असेल, जे खोटं कुंभाड रचताहेत, या खोट्या भानगडी करत त्यांच्यावर कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले.





