मी ठरवले असते तर काही नेते तुरुंगात असते; मंत्री जयकुमार गोरे

खंडाळा : नुकतीच झाली असताना, मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवले असते तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातील किमान चार नेते तुरुंगामध्ये असते. मात्र, मी तसा वागलो तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय, असा टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर व विरोधकांना नाव न घेता लगावला.
अशी एक निवडणूक नाही जिथे जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल नाही, मला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले. परंतु, जनता माझ्यासोबत असल्याने या गोष्टींचा मला विशेष फरक पडला नाही. खंडाळा तालुक्यातही राजकीय प्रदूषण फार वाढले असून, तेही लवकरच दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
अहिरे (ता. खंडाळा) येथे अविनाश धायगुडे पाटील विकास सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन, मंत्री गोरे यांचा नागरी सत्कार व ऋषीकेश धायगडे पाटील यांचा वाढदिवस यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार मदन भोसले अध्यक्षस्थानी होते. अविनाश धायगुडे खंडाळा तालुक्याचे कल्पवृक्ष होते, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते आयुष्यभर झगडले, ते जाऊन इतके वर्ष झाली, तरीही अविनाश धायगुडे व कुटुंबीयांवरील जनतेचे प्रेम तितकेच आहे.
याचा प्रत्यय आजच्या गर्दीतून येतो. आगामी काळात ऋषीकेशसाठी वाटेल त्या गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी असन लागेल ती मदत केली जाईल. असा शब्द गोरे यांनी दिला. अनेक गावांतील नागरिकांनी विकास कामांबाबत दिलेल्या निवेदनातील सर्व कामे पूर्ण केली जातील व हीच माझ्याकडून ऋषिकेशसाठी वाढदिवसाची भेट असेल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.
या मतदारसंघांमध्ये ऋषिकेश व सहकारी जी भूमिका घेतील, ज्या निवडणुकीला उभे राहतील त्या ठिकाणी त्यांना यश मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. किंबहुना, अविनाश धायगुडे यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर हे स्वप्न पूर्ण करणे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, असे श्री. मदन भोसले यांनी सांगितले.
याप्रसंगी धैर्यशील कदम, सुनील काटकर, विराज शिंदे, शशिकांत पिसाळ, चिन्मय कुलकर्णी, अनिरुद्ध गाढवे, हर्षवर्धन शेळके, अतुल पवार, प्रदीप माने, दीपक ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम अविनाश धायगुडे पाटील विकास सोसायटीच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांच्या उपस्थितीत झाला.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल जयकुमार गोरे यांचा खंडाळा तालुक्याच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. लोणंद बाजार समितीचे संचालक बाळकृष्ण रासकर, सुखेडचे माजी उपसरपंच तात्यासाहेब पडळकर यांच्यासह अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.





