चीन-बांगलादेशदरम्यान होणार संयुक्त युद्धसराव

बीजिंग- चीन आणि बांगलादेशच्या सैन्यदलांमध्ये पुढील महिन्यात पहिल्यांदाच संयुक्त युद्धसराव होणार आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्यावतीने आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारताच्या शेजारी देशांवरील प्रभाव चीनकडून हळूहळू वाढवला जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
चीन आणि बांगलादेशच्या सैन्यदलांमध्ये संयुक्त युद्धसरावाबाबत एकमत झाले आहे. चीनच्या सैन्यदलाची एक तुकडी पुढील महिन्यात बांगलादेशला जाणार आहे. या युद्धसरावाला गोल्डन फ्रेन्डशीप २०२४ असे नाव देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांती पथकाचे प्रशिक्षण आणि दहशतवाद विरोधी कारवाईसाठी हा सराव केला जाणार आहे.
यामध्ये दहशतवाद्यांकडून बसचे अपहरण रोखण्याच्या उपाययोजना आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईचा समावेश असणार आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी सांगितले. चीनने बांगलादेशातील विविध विकास प्रकल्पांमध्ये २५ अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे.
लढाऊ रणगाडे, नौदल फ्रिगेट्स, क्षेपणास्त्र नौका याशिवाय लढाऊ विमानांसह लष्करी उपकरणे चीनने बांगलादेशला पुरवली आहेत. आगोदर ही उपकरणे बांगलादेश भारताकडून घेत होता. याशिवाय चीनने यापूर्वी बांगलादेशच्या नौदलाला दोन पाणबुड्याही दिल्या आहेत.





