Pakistan : इम्रान खान यांचे अपक्ष दुसऱ्या पक्षात सामील

Pakistan – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष संसद सदस्य उजव्या कट्टरवादी विचारसरणीच्या सुन्नी इत्तेहादुल कौन्सिल या मित्र पक्षामध्ये सामील झाले आहेत.
संसदेमधील महिला आणि अन्य अल्पसंख्यांकांसाठीच्या आरक्षित जागा मिळवण्यासाठी पीटीआयने सुन्नी इत्तेहाद कौन्सिलबरोबर सोमवारी हा समोपचाराचा करार केला आहे. एसआयसी हा इस्लामी राजकीय आणि धार्मिक पक्षांचा गट आहे.
या गटामध्ये सुन्नी धार्मिक शाळांचे अनुयायी आहेत. पीटीआयच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय आणि प्रांतीय विधीमंडळांमध्ये निवडून आलेल्या सर्व अपक्षांनी एसआयसीमध्ये सामील होत असल्याचे एक प्रतिज्ञापत्र बुधवारी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
पीटीआयच्या ८९ सदस्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे संसदेतील ९३ जागा जिंकल्याच्या पीटीआयच्या दाव्याचे समर्थनच होते.
पीटीआयचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर खान यांच्यासह पंतप्रधान पदाचे उमेदवार ओंमर आयुब खान यांच्यासह अली आमिन गंदापूर यांनी मात्र असे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.
तर आणखीन एका उमेदवाराच्या विजयाची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून अद्याप जारी करण्यात आलेली नाही. गौहर खान आणि ओमर आयुब खान यांनी पक्षांतर्गत निवडणूक पुन्हा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.
गौहर खान हे पक्षाचे अध्यक्षपदासाठीचे नामनिर्देशित उमेदवार आहेत. तर गंदापूर यांना पक्षाच्यावतीने खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे.





