Mustafizur Rahman : भारत-बांगलादेश क्रिकेट संबंध धोक्यात! मुस्तफिजुर प्रकरणावरून वाद पेटला; नेमकं प्रकरण काय?

Mustafizur Rahman Release Controversy : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल २०२६ मधून बाहेर करण्याचा बीसीसीआयचा निर्णय आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वादाचे कारण बनला आहे. या प्रकरणामुळे केवळ भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिकाच नाही, तर भारतात याच वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवरही संकटाचे ढग जमा झाले आहेत.
बांगलादेश बोर्डाचा आयसीसीकडे धाव घेण्याचा इशारा –
मुस्तफिजुरला केकेआरमधून रिलीज केल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “टी-२० वर्ल्ड कप हा आयसीसीचा इव्हेंट आहे आणि भारत केवळ त्याचा यजमान आहे. जर आम्हाला या विषयावर काही बोलायचे असेल, तर आम्ही थेट आयसीसीशी चर्चा करू.” त्यांच्या या विधानाचा अर्थ बांगलादेश हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
“भारत आंतरराष्ट्रीय इव्हेंटसाठी अनफिट”- आसिफ महमूद
मुस्तफिजुर रहमानच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे माजी सल्लागार आसिफ महमूद यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. ते म्हणाले, “अशा कट्टर देशाला कधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद देऊ नये. बीसीसीआयविरुद्ध मोर्चा उघडण्यासाठी बीसीबीने इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांशी संवाद साधला पाहिजे. भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ‘अनफिट’ घोषित करण्याची वेळ आली आहे.”
नेमका वाद काय?
केकेआरने ९.२० कोटी रुपयांना विकत घेतलेल्या मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयच्या निर्देशानंतर संघातून बाहेर काढण्यात आले. बांगलादेशमध्ये सुरू असलेली हिंसा आणि तिथल्या सरकारची भारतविरोधी विधाने यामुळे भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागाला तीव्र विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा कठोर निर्णय घेतला. केकेआर आता मुस्तफिजुरच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध घेत आहे.





