IND vs ENG : जो रुटची कमाल! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत रचला इतिहास

IND vs ENG Joe Root break Sachin Tendulkar Record : जो रूटने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. सध्या रूट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि या कसोटी मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने धावा काढण्याची घाई न करता, खराब चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे धाडले आणि चांगल्या चेंडूंना पूर्ण सन्मान दिला. या दरम्यान त्याने २४८ चेंडूत १५० धावांची खेळी साकारत सचिन तेंडुलकरच्या विक्रमासह अनेक विक्रम मोडले.
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
जो रूटने इंग्लंडच्या भूमीवर हे त्याचे २३वे कसोटी शतक ठोकले आहे. यासह, तो मायदेशात सर्वाधिक कसोटी शतके ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने महेला जयवर्धने (श्रीलंका), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) आणि रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) यांच्या २३ कसोटी शतकांच्या बरोबरी केली आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने भारतात २२ कसोटी शतके ठोकली होती, पण आता रूटने त्याला मागे टाकले आहे.
तिसऱ्या कसोटीतही ठोकले होते शतक –
RICKY PONTING APPRECIATING JOE ROOT FOR CROSSING HIM ON COMMENTARY. 🥺❤️ pic.twitter.com/DeTqq64LSE
— Johns. (@CricCrazyJohns) July 25, 2025
जो रूटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या कसोटीत त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आणि १०४ धावांचे शानदार शतक ठोकले. आता चौथ्या कसोटीतही त्याने शतक झळकावले आहे. यावेळी त्याने २४८ चेंडूचा सामना करताना १४ चौकारांच्या जोरावर १५० धावांची खेळी साकारली.
इंग्लंड संघाने पहिल्या डावात घेतली आघाडी –
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ ३५८ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडची सुरुवात खूपच चांगली झाली. सलामीवीरांनी १६६ धावांची भागीदारी केली. झॅक क्रॉलीने ८४, बेन डकेटने ९४ आणि ऑली पोपने ७१ धावा केल्या. जो रूटने सर्वाधिक १५० धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडने तिसरा दिवसअखेर ७ बाद ५४४ धावा केल्या असून १८६ धावांची आघाडी घेतली आहे.





