UPSC परीक्षेत अपयशी उमेदवारांना नोकरीची संधी ! सरकारी-खासगी क्षेत्रात करिअरचा नवा मार्ग

नवी दिल्ली : आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहणारे लाखो उमेदवार दरवर्षी यूपीएससी परीक्षा देतात, परंतु लाखोंपैकी मोजकेच उमेदवार यशस्वी होतात. अपयश पदरात पडूनही काहीजण पुन्हा जोमाने तयारीला लागतात, पण ज्यांचे वय संपले, त्यांच्यासाठी पुढची वाट खूप खडतर असते. एकतर ते कुठेतरी खासगी नोकरी करतात, किंवा व्यवसायाची वाट धरतात.
दरम्यान, अशा उमेदवारांसाठी आता यूपीएससीने रोजगाराचा मार्ग सोपा केला आहे. यूपीएससीने एक योजना आणली आहे, ज्याद्वारे मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारे, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या उमेदवारांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
यूपीएससीने प्रतिभा सेतू नावाची योजना सुरू केली आहे. याद्वारे खासगी आणि सरकारी संस्था त्या उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर करू शकतील. म्हणजेच काय, तर त्यांना नोकरीच्या संधी दिल्या जातील.
दरम्यान, यूपीएससीची ही योजना नवीन नाही. पूर्वीदेखील यूपीएससी चांगल्या उमेदवारांची माहिती कंपन्यांना किंवा जिथे नोकऱ्या मिळू शकतात, तिथे पाठवत असे. आता उमेदवारांची सर्व माहिती प्रतिभा सेतू वेबसाइटवर उपलब्ध असेल. मंत्रालये, स्वायत्त विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी कंपन्या प्रतिभा सेतू पोर्टलवर उमेदवारांची माहिती मिळवू शकतील. यासाठी कंपनीला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) घ्यावा लागेल.
उमेदवारांची माहिती उपलब्ध
यूपीएससीने म्हटले आहे की, नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त भूगर्भशास्त्रज्ञ, संयुक्त संरक्षण सेवा, भारतीय आर्थिक सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आणि संयुक्त वैद्यकीय सेवेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.





