Pune : यूपीएससी; विनामूल्य प्रशिक्षणासाठी सीईटी

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी पूर्व परीक्षेसाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २७ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना २६ जूनपर्यंत अर्ज करावा लागेल.
उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे या संस्थामार्फत हे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उमेदवारांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असून मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. सीईटीचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडायचे आहे.
प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी दिली.





