Jemimah Rodrigues : जेमिमाचं विजयानंतर बेभान ‘गिटार’ सेलिब्रेशन! VIDEO होतोय व्हायरल

Jemimah Rodrigues and Team India Video Viral : महिला वनडे विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली. गेल्या सात वर्षांपासून अजेय असलेल्या कांगारू संघाच्या ३३९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने नॉकआऊटमधील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने १२३ धावांची नाबाद खेळी साकारली. या विजयानंतर जेमिमाने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने फोबी लिचफील्डच्या ११९, एलिस पेरीच्या ७७ आणि एश्ले गार्डनरच्या ६३ धावांच्या जोरावर ३३८ धावा उभारल्या होत्या. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतासमोर सेमीफायनलमध्ये पुन्हा त्यांचेच आव्हान होते. पण जेमिमाने ५० षटकं मैदानावर तळ ठोकत कर्णधार हरमनप्रीत कौर (८९), दीप्ती शर्मा (२४), ऋचा घोष (२६) आणि अमनजोत कौरच्या साथीने अशक्य ते शक्य करून दाखवले.
बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडीओ –
📽️ Raw reactions after an ecstatic win 🥹
The #WomenInBlue celebrate a monumental victory and a record-breaking chase in Navi Mumbai 🥳
Get your #CWC25 tickets 🎟️ now: https://t.co/vGzkkgwXt4 #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/MSV9AMX4K1
— BCCI Women (@BCCIWomen) October 31, 2025
सामना संपल्यानंतर मैदानावरील जल्लोष अविस्मरणीय ठरला. बीसीसीआय महिला एक्स हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओत भावनिक झालेल्या खेळाडूंच्या अश्रूंचा, हरमनप्रीतच्या डोळ्यातील विजयाच्या चमक आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या समाधानाचा प्रत्यय येतो. यातच जेमिमाने स्टँड्सकडे पाहत मैदानाला हात लावून, बोट दाखवत आणि एका पायावर उभे राहून बेभान गिटार वाजवण्याची कृती करत प्रेक्षकांना अभिवादन केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जेमिमाच्या या खेळीमुळे मोडले अनेक जागतिक विक्रम :
- सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग: महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ३३९ धावांचा हा सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग ठरला.
- विश्वचषक नॉकआऊटमधील विक्रम: पुरुष आणि महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात नॉकआऊट सामन्यात इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची ही पहिलीच वेळ होती.
- नॉकआऊटमधील यशस्वी शतक: विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करताना शतक करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
- ऑस्ट्रेलियाचा दबदबा संपुष्टात: ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील १६ सामन्यांची अजिंक्य मालिका या एका पराभवाने संपुष्टात आणली.
देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये भारत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल.





