जेईई- अॅडव्हान्सचा निकाल जाहीर

पुणे – देशातील आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जेईई- अॅडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात दिल्ली झोनच्या वेद लाहोरी याने ३६० पैकी ३५५ गुण मिळवून देशात अव्वल क्रमांक मिळविला. मुलींमध्ये मुंबईची द्विजा पटेल या विद्यार्थिनीने ३३२ गुण मिळवित देशात अव्वल क्रमांक पटकाविला.
मुंबई झोनमधून राजदीप मिश्रा (सहावा), ध्रुवीन दोशी (नववा), शॉन कोशी (१५वा) आणि आर्यन प्रकाश (१७वा) यांनी अव्वल कामगिरी केली आहे. दिल्ली झोनचा आदित्य (३४६ गुण) दुसऱ्या रॅंकवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर भोगलपल्ली संदेश (३३८ गुण) हा मद्रास झोनचा विद्यार्थी आहे. चौथ्यावर रूरकीचा रिदम केडिया (३३७ गुण) आहे. तर पाचवा क्रमांक मद्रासच्या पुट्टी कुशल कुमार (३३४ गुण) याने पटकावला आहे.
या परीक्षेस देशभरातून १.८० लाख विद्यार्थी बसले होते. जेईई-मेनमध्ये पात्र ठरलेल्या निवडक विद्यार्थ्यांना जेईई-अॅडव्हान्सला बसता येते. यापैकी ४८ हजार २४८ विद्यार्थी आयआयटीतील प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत. जेईई-अॅडव्हान्सकरिता नोंदणी केलेल्या १ लाख ४३ हजार ६३७ मुलांपैकी १ लाख ३९ हजार १८० मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ४० हजार २८४ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. तर नोंदणी केलेल्या ४२ हजार ९४७ मुलींपैकी ४१ हजार २० मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार ९६४ मुली प्रवेशाकरिता पात्र ठरल्या आहेत.





