Indapur : यशाला शॉर्टकट आणि कष्टाला पर्याय नसतो – श्रीमंत ढोले

नीलकंठ मोहिते
इंदापूर : यशाला शॉर्टकट नसतो आणि कष्टाला पर्याय नसतो. आपण स्वतः गरिबीतून शिक्षण घेऊन प्रगती केली आहे. आपले कुटुंब हे शेतकरी कुटुंब असले तरी ज्ञान हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. हे मला वडिलांनी मनावर बिंबवले त्यामुळे मी स्वतः कष्ट करून ज्ञान मिळवले परंतु माझ्यामागून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्ञान सुलभपणे मिळावे यासाठी आपण जेबीव्हीपीची निर्मिती केली, अशी माहिती संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी दिली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडमध्ये विद्यार्थांनी सीईटी, नीट, जेईई परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्या ५३ यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले मार्गदर्शन करीत होते.
पुढे मार्गदर्शन करताना ढोले म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना लातूर, कोटा या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा लाखेवाडी मध्ये मिळाव्यात. यासाठी JBVP अकॅडमीची सुरुवात संस्थेने केली. लातूर कोटा या ठिकाणी स्वतः व्यक्तिगत जाऊन त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक अनुभूतीचा बारकाईने अभ्यास केला. व लातूर येथे शिकवणाऱ्या तज्ञ प्राध्यापकाची नेमणूक आपल्या संस्थेत केली.
मापक फी मध्ये लाखेवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये लातूर, कोटा या ठिकाणी ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जाते. दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन गेल्या सहा वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून डॉक्टर झाले, अशी ही माहिती श्रीमंत ढोले यांनी दिली.
10 हजार रुपये रोख रक्कम स्कॉलरशिप
यावेळी नीट परीक्षेमध्ये सृष्टी निकम हिने ४६३ गुण प्राप्त केले. सीईटी परीक्षेमध्ये प्रणाली केचे हिने ९९.०१ टक्के गुण मिळवले. तर जेईईमध्ये अंकिता खाडे हिने ९१ टक्के गुण मिळवले. या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान यावेळी पार पडला. संस्थेने ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये रोख रक्कम स्कॉलरशिप स्वरूपात देण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.





