राज्यातही वर्षातून दोन वेळा सीईटी

पुणे – विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची सीईटी वर्षातून दोनदा घेणार आहे. याशिवाय सीईटी सेलच्या मालकीची परीक्षा केंद्रे स्थापन करण्याचेही ठरविले आहे. यामुळे सीईटी सेल अधिक सक्षम, विद्यार्थीभिमुख, विश्वासार्ह होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी देणे बंधनकारक आहे. आयआयटी, एनआयटीसह देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन परीक्षा घेतली जाते. ती वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातही सीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक, आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आदींचे सविस्तर नियोजन केले जात आहे.
सीईटी सेलने पुढील वर्षापासून राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे बंद करण्याचे ठरवले आहे. सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आयटीआय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी…
सध्या सीईटी सेल खासगी संस्था, डिजिटल प्रशिक्षण केंद्रांकडून परीक्षा केंद्रे भाड्याने घेते. तेथे तांत्रिक अडचणी, उपकरणांची कमतरता आणि व्यवस्थापनातील त्रुटी जाणवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येतात. यासाठी सीईटी सेलने राज्यात स्वतःची परीक्षा केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या आणि तांत्रिक गरजांचे विश्लेषण सध्या सुरू आहे. त्याच्या आधारे परीक्षा केंद्रांची संख्या व ठिकाणे निश्चित होतील. पुढील वर्षात ही केंद्रे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.





