आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
जागतिक स्तरावर होणाऱ्या या पहिल्या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.
या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासनादरम्यान ‘वेव्हज २०२५’ निमित्त सामंजस्य करार झाला.





