Jasprit Bumrah : ‘तू रनअपमध्ये धावत नाहीस अन् माझ्यासोबत काय…’, संजनाच्या गुगलीवर बुमराह क्लीन बोल्ड, VIDEO व्हायरल

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan Video Viral : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन यांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हरभजन सिंग आणि गीता बासरा यांच्या ‘हूज द बॉस’ या यूट्यूब शोच्या प्रोमो क्लिपमध्ये संजनाने जसप्रीतच्या अनोख्या रन-अपवर केलेल्या विनोदाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले असून, हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाला आहे.
संजनाच्या गुगलीवर बुमराह क्लीन बोल्ड –
शोमध्ये हरभजनने जसप्रीत आणि संजना यांच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारले असता, संजनाने त्यांच्या लग्नापूर्वीच्या एका गमतीशीर प्रसंगाचा उल्लेख केला. तिने सांगितले की, जसप्रीत एकदा गमतीने म्हणाला होता की, आपण पळून जाऊन लग्न करुया. यावर संजनाने चटकन उत्तर दिले, “तू तुझ्या रन-अपमध्येच धावत नाहीस, माझ्यासोबत काय पळणार?” हा तिचा हजरजबाबी आणि खट्याळ टोमणा ऐकून हरभजन आणि गीता खळखळून हसले, तर जसप्रीत लाजला आणि त्याचा चेहरा लाल झाला. हा क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आणि तो आता नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
😭😭😭 pic.twitter.com/K0dmyBrblR
— 93Yorker (@93Yorker) June 26, 2025
जसप्रीत बुमराह हा त्याच्या छोट्या आणि प्रभावी रन-अपसाठी जगभरात ओळखला जातो, ज्यामुळे त्याची गोलंदाजी अधिक घातक ठरते. संजनाने हाच मुद्दा पकडून केलेली मस्करी प्रेक्षकांना खूपच आवडली. हे जोडपे २०२१ मध्ये गोव्यात खासगी समारंभात विवाहबद्ध झाले आणि २०२३ मध्ये त्यांना मुलगा झाला. संजना आयसीसी आणि आयपीएलसारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटेटर म्हणून काम करते. हा व्हिडीओ एक्सवर लाखो व्ह्यूज मिळवत असून, संजनाच्या विनोदी शैलीचे आणि या जोडप्याच्या केमिस्ट्रीचे नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : एजबॅस्टन कसोटीपूर्वी गंभीरचा मास्टरप्लॅन: बुमराहच्या खेळण्यावर मोठा निर्णय
बुमराहची पुढील सामना खेळणे कठीण –
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. तथापि, अहवालानुसार, वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराहला पुढील सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते, कारण प्रशिक्षक गौतम गंभीरने यापूर्वीच सांगितले आहे की तो या दौऱ्यावर केवळ ३ कसोटी सामने खेळेल.





