जपानी महिला व तिच्या मुलावर चीनमध्ये चाकू हल्ला; जपानी नागरिकांना सावध राहण्याचा दिला इशारा

बीजिंग – चीनच्या सुजौ या शहरात एक जपानी महिला आणि तिच्या मुलासह तीन जणांवर आज चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. जपानच्या दुतावासाच्या प्रवक्त्याकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
चीनच्या पूर्व भागातील सुजौ शहरात जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेच्या बस स्टॉपवर हल्लेखोराने अचानक चाकू हल्ला केला. त्यात ही जपानी महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला.
दरम्यान, त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र एका चीनी महिलेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिच्यावरही हल्ला केला.
जपानी महिला आणि तिच्या मुलाला फार गंभीर इजा झालेली नाही, मात्र चीनी महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवक्त्याने आरोपीचे नाव उघड केलेले नाही तसेच या हल्ल्यामागचा त्याचा उद्देश काय होता हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर जपानने चीनमध्ये राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चीनमध्ये अलिकडच्या काळात अशा प्रकारे चाकू हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच महिन्याच्या सुरूवातीला चीनच्या जीलीन शहरात अमेरिकी विद्यापीठाच्या चार प्रशिक्षकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता.
मे महिन्यातही एका रूग्णालयात दोन जणांवर झालेल्या हल्ल्यात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात २१ जण जखमी झाले होते.





