Jammu & Kashmir Election : जम्मू-काश्मीरचा रणसंग्राम ! राजकीय घराण्यांमधील १३ जण बनले आमदार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील १३ नवनिर्वाचित आमदार राजकीय घराण्यांमधील आहेत. राजकीय वारसा लाभलेल्या तशा आमदारांचे सर्वांधिक प्रमाण नॅशनल कॉन्फरन्समध्ये आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकताच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम झाला.
त्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची सरशी झाली. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत.
त्यांचे वडील फारूक अब्दुल्ला आणि आजोबा शेख अब्दुल्ला यांनीही मुख्यमंत्रिपद भुषवले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमिद कर्रा यांचीही कौटूंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे.
राजकीय वारसा लाभलेल्या आमदारांमध्ये प्रामुख्याने नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस आणि पीडीपीच्या नेत्यांचा समावेश आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून राजकारण अनेकदा तापताना दिसते.
प्रामुख्याने भाजपकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी त्या मुद्द्याचा वापर केला जातो. यावेळच्या जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीवेळीही भाजपने तो मुद्दा उपस्थित केला. त्यावरून विरोधकांकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला.
तो मुद्दा चर्चेचा विषय ठरला तरी डझनभरापेक्षा अधिक आमदार जनतेचा कौल मिळाल्याने राजकीय वारसा पुढे चालवताना दिसतील. त्यातील प्रमुख चेहरा असणारे उमर अब्दुल्ला तर जम्मू-काश्मीरच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहेत.





