जम्मू काश्मीरमध्ये भाजपला ‘या’ 5 कारणांमुळे बसला पराभवाचा फटका

जम्मू – काश्मीर : जवळपास 10 वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. सध्याच्या मतमोजणीच्या कलानुसार, राज्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. तर, भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसताना दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला का फटका बसला याची कारणे जाणून घेऊयात…
निवडणूकपूर्व आघाडी
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्यात त्रिशंकू विधानसभा होऊ नये आणि मतविभाजनाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी निवडणूकपूर्व आघाडी केली. निवडणुकीपूर्वी भाजप हा मोठा पक्ष ठरेल आणि सत्तेच्या नजीक जाईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जागा वाटप सहमतीने पूर्ण केले. पाच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. भाजपविरोधी मते विखुरले जाऊ नये याची काळजी या आघाडीने घेतली.
भाजपाविरोधात जनमत
राज्यात भाजपविरोधी जनभावना निर्माण झाली होती. जम्मूचा भाग वगळता काश्मीर खोऱ्यात ही भावना मोठ्या प्रमाणात होती. या सगळ्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसून आला. जम्मूत भाजपला चांगले यश मिळाले. तर, काश्मीर खोऱ्यात काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला चांगली मते मिळाली. भाजप ही राज्यातील भावनांचे योग्य प्रतिनिधीत्व करत नसल्याचे मतदारांना वाटले म्हणून त्यांनी भाजपला नाकारत आघाडीला मतदान केले.
पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी प्रयत्न करणे आणि भाजपामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या आश्वासनांवर काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सने आपला भर ठेवला. मतदारांनादेखील आपलं राज्य केंद्रशासित झालं ही बाब खटकली आणि त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला.
प्रभावी प्रचार मोहीम
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जुने राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा एक मतदार वर्ग आहे. त्याशिवाय, अब्दुला कुटुंबीयांचा काश्मीरमध्ये चांगला प्रभाव आहे. त्याचा मोठा फायदा त्यांना झाला. त्याशिवाय, जम्मूच्या भागात भाजपला चांगला फायदा झाला. जम्मू भागात मागील काही वर्षांपासून भाजपने चांगली पकड बसवली आहे.नॅशनल कॉन्फरन्सने पीडीपीवर भाजपसोबत युती करण्याच्या मुद्यावर काश्मिरी जनतेवर विश्वासघाताचा आरोप केला. तर, काँग्रेसने स्थानिक प्रशासनाच्या मुद्यावर भर दिला.
मागील पाच वर्षाच्या कामाचा मुद्दा
या ठिकाणी 10 वर्षांनी निवडणूक पार पडली. या ठिकाणच्या लोकांना राज्याचा जुना सन्मान पुन्हा हवा होता. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने पूर्ण राज्याच्या दर्जाचा मुद्दा प्रचारात अधोरेखित केला आणि याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.





