जम्मू-काश्मीर निवडणूक: उमर अब्दुल्ला यांचे भवितव्य लागले पणाला; दोन्ही मतदार संघात होणार तगडी लढत

Jammu Kashmir Election – Omar Abdullah | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरु झाले आहे. या टप्प्यात केंद्रशासित प्रदेशातील 26 जागांवर मतदान होत आहे. निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात सुमारे 25 लाख मतदार आपल्या मतांचा वापर करून रिंगणातील 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि भाजपचे रवींद्र रैना यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. दोन जागांपैकी एक जागा गांदरबल आहे जिथून ते आमदारही झाले आहेत तर दुसरी जागा बडगाम आहे. ओमर अब्दुल्ला यांच्यासमोर गांदरबलची जागा परत मिळवण्याचे कडवे आव्हान आहे. गांदरबल ही जागा अब्दुल्ला यांची कौटुंबिक जागा मानली जाते. त्यांचे आजोबा शेख अब्दुल्ला आणि वडील फारुख अब्दुल्ला यांनीही या जागेवरून आमदारकीची निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.
– गांदरबल मतदारसंघ: नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला पीडीपीचे बशीर अहमद मीर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत उमर या जागेवरून विजयी झाले होते. 2014 मध्ये या जागेवरून नॅशनल कॉन्फरन्सचे इश्फाक अहम शेख विजयी झाले होते.
– बडगाम मतदारसंघ: नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. ही त्यांची दुसरी सीट आहे. तर पीडीपीने आगा सईद मुंतजीर मेहदी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर मेहदी कुटुंबाचा बराच प्रभाव असल्याचे मानले जाते. 2008 आणि 2014 च्या निवडणुकीत एनसीचे उमेदवार आगा सईद रुहुल्ला मेहदी यांनी या जागेवर विजय मिळवला होता.
दरम्यान, ओमर अब्दुल्ला हे लाल चौक मतदारसंघातील सोनवार मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.
मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
2014 पासून आतापर्यंत 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 जागांसाठी मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.





