Jammu and Kashmir Elections : ‘जम्मू-काश्मीर’मधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; अखेरच्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान

Jammu and Kashmir Elections – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. आता त्या केंद्रशासित प्रदेशात तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होईल.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यातील ४० जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होईल. अंतिम टप्प्यात एकूण ४१५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य ठरवण्यासाठी ७ जिल्ह्यांमधील मतदार त्यांचा हक्क बजावतील.
त्या जिल्ह्यांमध्ये जम्मू, उधमपूर, सांबा, कठुआ, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोराचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला ६१.३८ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला ५७.३१ टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळली. त्याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाच्या प्रचाराची बाजू सांभाळली.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या प्रचाराच्या तोफाही धडाडल्या. फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्र्यांनीही प्रचारात रंग भरले.





