Vaishnavi Hagavane death case update : वैष्णवी हगवणे मृ्त्यू प्रकरणात मोठी अपडेट! महिला बालकल्याणचा धक्कादायक अहवाल समोर, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या!

Vaishnavi Hagavane death case update : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत गेले. या प्रकरणात पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आता महिला बालकल्याण अहवालातून सुपेकर यांच्यावर कारवाई न करणे गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
विधानसभेत अहवाल सादर
महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळी प्रकरणाबाबतचा पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात हगवणे प्रकरणातील तपासाचे निष्कर्ष, यातील आरोपींना शिक्षा व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासह राज्यातील यंत्रणा व व्यवस्थेच्या अंमलबजावणीतील त्रुटी व त्यावरील उपाययोजना, शिफारशी आहेत.
सुपेकरांच्या अडचणी वाढल्या
या शिफारसींमध्ये तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी. ते दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची कार्यवाही शिफारसही करण्यात आली आहे. आता यामुळे सुपेकर यांच्या हगवणे प्रकरणामुळे अडचणी वाढल्या आहेत.
हे गंभीर असल्याचे स्पष्ट मत
सुपेकर यांची ध्वनिफीत माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. याविषयीचे निरीक्षण नोंदविताना अहवालात सुपेकर यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट असतानाही कोणतीही कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आलेली नाही, हे गंभीर असल्याचे स्पष्ट मत अहवालात नोंदविण्यात आले आहे.
हेही वाचा : Vijay Deverakonda । विजय देवरकोंडाची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल





