इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची फोनवरून चर्चा

तेल अविव – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी बोलून गाझामधील परिस्थितीवर चर्चा केली. युद्धस्थिती अतिशय गंभीर बनलेली असताना जयशंकर यांनी कोहेन यांच्या संपर्कात राहण्याची हमी दिली.
गाझा, लेबेनान आणि सागरी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरही कोहेन यांच्याशी चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात इस्रायल आणि हमास दरम्यानचे युद्ध सुरू झाल्यावर नोव्हेंबर महिन्यात देखील जयशंकर यांनी कोहेन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याला अनुसरून आणि द्विराष्ट्र धोरणाला अनुसरून दहशतवादाविरोधातल्या संघर्षामध्ये भारताचा इस्रायलला पाठिंबा असल्याची ग्वाही त्यांनी त्यावेळी दिली होती.
आज झालेल्या चर्चेदरम्यान गाझामधील सध्याची परिस्थिती आणि प्रादेशिक स्थिरता, शांतता कायम राहण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे कोहेन यांनीही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मानवतावादी कायद्यांचे पालन केले जावे आणि संघर्ष सुरू असलेल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर जयशंकर यांनी यावेळी विशेष भर दिला.





