मस्कत येथे जयशंकर यांची विविध नेत्यांशी चर्चा

मस्कत (ओमान) : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांच्याशी व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेतील द्विपक्षीय सहकार्यावर विस्तृत चर्चा केली. जयशंकर यांनी हिंद महासागर परिषदेच्या निमित्ताने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि ब्रुनेईसह अनेक इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.
ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरच्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्तपणे लोगोचे प्रकाशन केले. त्यांनी संयुक्तपणे मांडवी टू मस्कट: इंडियन कम्युनिटी अँड द शेअर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया अँड ओमान या पुस्तकाचे प्रकाशन केले.
नंतर जयशंकर यांनी त्यांचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांचीही भेट घेतली. जयशंकर यांनी ब्रुनेईचे परराष्ट्र मंत्री दातो एरिवान पेहीन युसूफ यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी भूतानचे परराष्ट्र मंत्री डी एन ढुंग्येल यांच्याशी भेट घेतली आणि द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याबाबत चर्चा केली. याशिवाय श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरझू राणा देऊबा, मॉरिशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री धनंजय रितिश रामफुल. आणि मालदीवचे समकक्ष अब्दुल्ला खलील यांचीही त्यांनी भेट घेतली.





