इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा

म्युनिक (जर्मनी) : म्युनिक सरुक्षा परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडोन सा़’अर यांची भेट घेतली आणि महत्वाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थितीबरोबर आशिया, युरोप आणि अमेरिकेला इस्रायलसह जोडण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीकोनावरही चर्चा झाली.
सा’अर यांनी भारतासोबतच्या संबंधांना इस्रायल किती धोरणात्मक महत्त्व देते यावर इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात प्रकाश टाकला आहे. एक महान व्यापारी मार्ग विकसित करण्यावर भारत आणि अमेरिकेने सहमती दर्शवली असल्याचे पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान ट्रम्प म्हणाले होते.
हा व्यापारी मार्ग भारतापासून इस्रायलमार्गे पुढे अमेरिकेपर्यंत जाईल. या मार्गामध्ये मित्र देशांच्या बंदरांना, रेल्वे आणि सागराखालून गेलेल्या केबलच्या माध्यमातून जोडले जाईल, असेही जयशंकर म्हणाले. या मार्गासाठी खूप खर्च होणार आहे. त्यापैकी बराच खर्च आपण केला आहे.
मात्र अधिक प्रगत होण्यासाठी आणि नेतृत्व करत राहण्यासाठी आपल्याला अधिक जास्त खर्च करावा लागणार आहे. भारत ते युरोपाला जोडणाऱ्या मध्यपूर्वेतून जाणाऱ्या मार्गावर अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांची घोषणा नवी दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेदरम्यान करण्यात आली होती, असेही जयशंकर म्हणाले. हौथी आणि इराणकडून व्यापार मार्गांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांबद्दलही जयशंकर आणि सा़’अर यांनी चर्चा केल्याचे इस्रायली निवेदनात म्हटले आहे.





