परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली युक्रेनच्या नेत्यांची भेट

म्युनिक : म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सेबिहा यांची भेट घेतली आणि रशिया-युक्रेन संघर्षाबाबत चर्चा केली. रशिया – युक्रेन दरम्यानच्या संघर्षावरील तोडग्याबाबत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. युक्रेनबरोबरच्या द्विपक्षीय भागीदारीबद्दल देखील चर्चा झाली, असे जयशंकर यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
म्युनिक संरक्षण परिषदेच्या निमित्ताने जयशंकर यांनी जगभरातील इतर अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली आणि लोकशाहीच्या मजबूतीकरणाच्या विषयावरील एका चर्चासत्रामध्येही भाग घेतला. भारतापुढील सुरक्षाविषयक आव्हाने या विषयावरील परिसंवादामध्येही जयशंकर सहभागी झाले. परिसंवादामध्ये जागतिक सहभाग, प्रादेशिक धोरण आणि प्रमुख द्विपक्षीय भागीदारीविषयी त्यांनी आपली मते मांडली.
जयशंकर यांनी बव्हेरियन पंतप्रधान मार्कस सोडर यांचीही भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर चर्चा केली. याशिवाय शुक्रवारी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांचीही त्यांनी भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेनशी संबंधित घडामोडींवर चर्चा केली.




