अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांच्या भेटीसाठी जयशंकर वॉशिंग्टनमध्ये दाखल

वॉशिंग्टन – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांची भेट घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय तसेच जागतिक पातळीवरील अनेक विषयांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे.
रशिया – युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या मुद्यावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या सत्राला उपस्थित राहण्यासाठी जयशंकर न्यूयॉर्कमध्ये होते.
रविवारी ते वॉशिंग्टनला रवाना झाले असून तेथे ते कॅबिनेट श्रेणीच्या इतरही काही महत्वाचे नेते आणि बायडेन प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
अमेरिकेतील थिंक टँक समुदायाशीही जयशंकर वार्तालाप करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या भावी संबंधांच्या मुद्यावर द कार्नेज एन्डोवमेंट फॉर इंटरनॅसनल पीस या संस्थेने जयशंकर यांच्याबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.





