Jaipur Tanker Blast : गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या 14; न्यायालयाने घेतली स्वतःहून दखल

Jaipur Tanker Blast – जयपूरमध्ये शनिवारी गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. या घटनेची स्वत:हून दखल घेत राजस्थान उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. नोटीस जारी करून न्या. अनुप कुमार धांड यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवली आहे.
या भीषण अपघातावर खंडपीठाने केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि राजस्थानचे मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. एका दुर्दैवी घटनेने अनेकांचे प्राण घेतले आणि अनेकांचे जीव धोक्यात आणले, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने अशा दुर्दैवी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे.
दरम्यान, जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी स्थापन केलेल्या समितीने आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली. ही समिती सोमवारी आपला अहवाल सादर करू शकते. शनिवारी सायंकाळपर्यंत या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अपघातात भाजलेल्या २४ जणांवर उपचार सुरू आहेत.
सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, काल पाच जळालेले मृतदेह सापडले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये २४ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सात रुग्ण लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. अद्यापही पाच मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. भांक्रोटा भागात जयपूर-अजमेर महामार्गावर शुक्रवारी पहाटे एका ट्रकने एलपीजी टँकरला धडक दिली, ज्यामुळे आगीत 35 हून अधिक वाहने जळून खाक झाली होती.





