उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन

पुणे – गरीब रुग्णांना उपचार आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात शुक्रवारी (दि. 30) रुग्ण हक्क परिषदेतर्फे शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून तहसील कार्यालयाला त्वरित दाखले देण्याची मागणी करण्यात आली.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या अनोख्या धार्मिक स्वरूपाच्या आंदोलनात संबळ वाजवत गोंधळींनी “तहसीलदारांना जाग येऊ दे, गरीब रुग्णांना न्याय मिळू दे” असे साकडे घातले. यावेळी परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा मारणे-साठ्ये, लोक जनशक्ती पार्टीचे संजय आल्हाट, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, कविता डाडर, प्रभा अवलेलू, सोनाली ओव्हाळ, रेखा वाघमारे, चित्रा साळवे, मुकुंद गायकवाड, राहुल गायकवाड, सुरेश फाले, रेश्मा जांभळे, शारदा लडकत, डॉ. योगेश कदम, विमल सोंडे, अनिता चिंचोलीकर, मंदार देसाई, विनोद बाफना, साईराज जांभळे, रजनी पाचंगे, मंगल रासगे आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या एका महिन्यापासून तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी विलंब होत आहे. यामुळे रुग्णांना मोफत आरोग्य योजनांचा लाभ मिळत नाही, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया खोळंबते. खाजगी ई-सेवा केंद्रांवर मनमानी शुल्क आकारले जाते, तरीही दाखले मिळण्यास २०-२५ दिवस लागतात. यामुळे गरीब रुग्ण आणि विद्यार्थ्यांना घरेदारे, दागिने गहाण ठेवावे लागत असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. “निद्रिस्त तहसीलदारांना जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. उत्पन्नाचे दाखले त्वरित द्यावेत,” अशी मागणी चव्हाण यांनी केली.





