नेवासा: ‘मतचोरी’च्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा; काँग्रेससह विविध संघटनांचा सहभाग

नेवासा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतदान हेराफेरीच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील काँग्रेस कमिटी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय स्वाभिमानी संघ आणि प्रहार शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १३) नेवासा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध करण्यात आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेंगलुरू येथे पुराव्यासह निवडणूक आयोगावर मतदान चोरीचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने दिल्लीत याविरोधात मोठे आंदोलन केले, ज्यात अनेक नेत्यांना पोलिसांकडून काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून, नेवासा तालुक्यातही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “नेवासा तालुक्यातही बोगस मतदानाची शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाचा डेटा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कोणताही घोटाळा उघड होऊ शकेल.” शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी तालुक्यात मत चोरीविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे पोपट सरोदे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले, “मोदी सरकार हे लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले नसून, निवडणूक आयोगाच्या मदतीने स्थापन झालेले हुकूमशाही सरकार आहे.” भारतीय स्वाभिमानी संघाचे गणपत मोरे यांनी तर पुढे जाऊन भाजप सरकारवर संविधानाची हत्या केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे.” प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सर्व समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र येऊन या अन्यायाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले.
या आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी गोसावी यांच्याकडे नेवासा विधानसभा निवडणुकीच्या मतदान डेटाची मागणी करण्यात आली. तसेच, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या निषेधाचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख, सतीश तऱ्हाळ, गोरक्षनाथ काळे, संजय वाघमारे, संजय होडगर, बाबासाहेब मिसाळ, विजय गोरे, गोरख बर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
“मत चोरी हा देशभरातील महाघोटाळा आहे. नेवासा तालुक्यातील मागील विधानसभा निवडणुकीतही बोगस मतदान झाल्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाचा डेटा उपलब्ध करून दिल्यास कोणताही घोटाळा उघड होऊ शकतो,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संभाजी माळवदे यांनी सांगितले.





