नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर 33 हरकती

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या १८ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३३ हरकतींवर गुरुवारी (दि. २८) सकाळी ११:३० वाजता नेवासा तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ३३ पैकी ३० तक्रारदार उपस्थित होते.
सुनावणी दरम्यान प्रांताधिकारी पाटील यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून त्यांच्या हरकती व आक्षेप नोंदवले. ही सुनावणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नेवासा नगरपंचायतीने २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेली १७ प्रभागांची प्रारूप रचना १८ ऑगस्ट रोजी बदलून प्रसिद्ध केली होती. यावर हरकती नोंदवण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, असे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी जाहीर केले होते.
सुनावणीवेळी तक्रारदारांनी प्रभाग रचनेवर अनेक आक्षेप नोंदवले. प्रभाग रचना मुख्य रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूने असावी, अशी प्रमुख मागणी होती. तसेच, प्रभाग रचना करताना बारीकसारीक गोष्टींचा विचार झाला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. प्रभाग रचनेसाठी प्रगणकांकडून कोणताही सर्व्हे झाला नसल्याचा आक्षेपही अनेकांनी नोंदवला. यावेळी तक्रारदारांनी प्रभाग रचनेला तीव्र विरोध दर्शवला.
सुनावणीला डॉ. करणसिंह घुले, संजय सुखधान, गुफुरभाई बागवान, सतीश गायके, सचिन नागपुरे, भाऊसाहेब वाघ, राजू पोतदार, अॅड. अशोक करडक, अमित मापारी, राजू मापारी, राजू मुथ्था, सुनील वाघ, रुपेश उपाध्ये, बंडू शिंदे, नितीन मिरपगार, कृष्णा डहाळे, भारत डोकडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या नावाखाली प्रभाग रचनेचा प्रशासकीयदृष्ट्या अनुकूल डाव साधण्याचा प्रयत्न झाला असून, हरकतींची सुनावणी ही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आहे, असा गंभीर आरोप उपस्थित तक्रारदारांनी व्यक्त केला.





