नेवासा तहसील कार्यालयात ९ वर्षापासून एकाच शाखेत, त्या कर्मचाऱ्याची होतेय चर्चा…

नेवासा – तहसील कार्यालयात एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल नऊ वर्षे एका महसूल शाखेत आणि त्याच टेबलवर कार्यरत असलेल्या या ‘आक्का’ला नेमका कोणाचा आशीर्वाद लाभला? महसूल शाखेच्या नियमावलीत असा काही अपवाद आहे का? असल्यास, हा ‘आक्का’ नऊ वर्षांपासून सलग एकाच ठिकाणी कसा कार्यरत आहे? कोणाच्या आश्रयाने तो तहसील कार्यालयात धडाकेबाजपणे कार्यरत आहे? आणि कोणाच्या छत्रछायेखाली तो ‘हमसे बढ़कर कौन?’ या अविर्भावात वावरत आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांवरून तहसील कार्यालयात चर्चेला उधाण आले आहे.
नऊ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने या ‘आक्का’ची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लहान-मोठे, वरिष्ठ-कनिष्ठ कर्मचारी त्याच्या धाकात वावरत असल्याचे चित्र आहे. महसूल विभागातून या ‘आक्का’च्या बंदोबस्ताची मागणी होत असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच शासन नियमांचा धाक दाखवून या ‘आक्का’ला नेवासा तहसील कार्यालयातून बदली करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महसूल विभागात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी शासनाची ठरलेली नियमावली असताना, या ‘आक्का’ने ती थेट पायदळी तुडवली आहे. यापूर्वी एकदाच त्याची बदली झाली होती, मात्र पुन्हा तो नेवासा तहसील कार्यालयात हजर झाला. सलग नऊ वर्षे एकाच ठिकाणी आणि त्याच शाखेत कार्यरत राहून, त्याने स्वतःचे ‘दालन’ चांगलेच रुबाबदार बनवले आहे. त्याचे राजेशाही थाटाचे वर्तन आणि वाढती ताकद यामुळे कनिष्ठ कर्मचारी त्रस्त झाले आहेत. महसूल शाखेत ‘राजा बोले आणि दल हले’ अशी स्थिती निर्माण झाली असून, तहसील कार्यालयातील सर्वच शाखांवर त्याचा दबदबा वाढला आहे.
अनेक तहसीलदार आले आणि गेले, पण ‘आक्का’चे टेबल जैसे थेच राहिले! त्यामुळे त्याच्या प्रभावामुळे अधिकारी आणि कर्मचारी हतबल झाले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आता योग्य ती कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे





