जगनमोहन रेड्डी म्हणतात, ‘वेळ वेगाने निघून जाते, पुन्हा सत्तेत येणार…’

अमरावती – आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याने माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांना सत्ता गमवावी लागली. मात्र, वेळ वेगाने निघून जाते, असे म्हणत त्यांनी राज्याच्या सत्तेत पुन्हा परतण्याविषयी आशावाद व्यक्त केला आहे.
लोकसभेबरोबरच आंध्रात विधानसभा निवडणूक झाली. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण १७५ जागा आहेत. त्यातील तब्बल १६४ जागा जिंकत टीडीपी, जनसेना आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएने आंध्रची सत्ता काबीज केली.
सत्ता गमावलेल्या वायएसआर कॉंग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. त्या पराभवानंतर बैठक घेत जगन यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
आपली राजकीय पीछेहाट तात्पुरत्या स्वरूपाची आहे. नव्या राज्य सरकारचा कार्यकाळ पाहता-पाहता संपेल. मतदार आपल्या आणि आताच्या सरकारांमधील फरक ओळखतील. वायएसआर कॉंग्रेसने यावेळी सुमारे ४० टक्के मतं मिळवली.
मागील निवडणुकीच्या तुलनेत आपण केवळ १० टक्के मतं गमावली. आपले राज्यसभेत ११, तर लोकसभेत ४ खासदार आहेत. त्यामुळे आपला पक्षही मजबूत आहे. कुणीच आपल्याला काही करू शकणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.





