Nagar | गुन्ह्यात पकडलेला मुद्देमाल संबंधितांना परत

अकोले, (प्रतिनिधी) – विविध गुन्ह्यात पकडलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांना परत करण्याची प्रक्रिया सुरू असून, संगमनेर, अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा हस्तगत मुद्देमाल पडून आहे. फिर्यादी, मूळ मालकांनी ओळख पटवून संबधित पोलीस स्टेशनला संपर्क करून आपला मुद्देमाल घेऊन जावे, असे आवाहन संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचाैरे यांनी केले आहे.
अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला चोरीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार त मूळ मालकांना आज उपअधीक्षक सोमनाथ वाघचाैरे यांचेहस्ते देण्यात आला. यावेळी अकोले पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भूषण हांडोरे, पो.कॅा.सुहास गोरे, पोकॅा.इंगळे, पोहेकॅा.बढे, आहेर,पोमकॅा खताळ आदी उपस्थित होते.
तालुक्यातील अंभोळ येथील सुरेश गेणु साबळे यांचे चोरीला गेलेले पाच तोळे दागिने त्यांना परत करण्यात आले. देविदास चंदू मुंढे यांना त्याचे मिल्कोस्प्रिन मशिन, तीन जणांना कुट्टी मशिनचे इंजिन मशिन असा मुद्देमाल परत देण्यात आला .
पत्नी व आईचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने चार महिन्यांपूर्वी घरातून चोरीला गेले होते. त्याबाबत मी अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर अकोले पोलिसांनी तपास करून गुन्हेगाराला पकडून मुद्देमाल जप्त केला.
न्यायालयामार्फत मला माझे दागिणे परत मिळवून दिले आहे. याबद्दल अकोले पोलिसांचे आभार मानतो. माझे दागिने चार महिन्यानंतर परत घरी नेल्यावर पत्नी व आईला खूप आनंद होईल, तो सांगता येणार नाही. सुरेश साबळे, अंभॊळ, ता. अकोले





