Kolhapur : परकीय शक्ती नव्हे, सत्तेच्या खुर्चीवर बसणारे देश तोडताहेत – योगेंद्र यादव

कोल्हापूर (प्रतिनिधी) – परकीय शक्ती देश तोडत नसून खुर्चीवर बसणारे देश तोडत आहेत, अशी घणाघाती टीका स्वराज्य इंडिया संस्थापक ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या या कृतीच्या विरोधात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू असून त्यामध्ये भाजप सोडून संविधानाला माननाऱ्या सर्व पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
भारत जोडो यात्रेच्या प्रचारार्थ समता भूमी कोल्हापूर ते नांदेड जनसंवाद यात्रेस यादव यांच्या हस्ते बुधवारी बिंदू चौक येथे सुरूवात झाली. या सभेनंतर राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
योगेंद्र यादव म्हणाले, देशाचे संविधान तोडले जात आहे. संविधानाचा हा गैरवापर सत्ताधारी, न्यायालय, सरकारी कर्मचारी करत आहेत. हा देश गांधींचा नसून गोडसेंचा बनवला जात आहे. बलात्कार करुन हत्या करणाऱ्या शिक्षा झालेल्या आरोपींचे फुलांच्या माळा घालून जंगी स्वागत केले जात आहे. स्वत:च्या मठातील तरुणींचे लैगिंक शोषण करणाऱ्या रामरहिम या तथाकथित साधूला दुहेरी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली असताना हरियाणात एका निवडणूकीसाठी तुरुंगातून सुट्टी दिली जात आहे.
ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशातील 97 टक्के नागरिकांचे उत्पन्न 100 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांवर आले असताना एका उद्योगपतीच्या उत्पन्नात 18 पटीने वाढ झाली आहे. गौतम अदानी यांचे फोर्ब्ज मासिकातील उत्पन्नाच्या पुराव्यावरुन लॉकडाऊनच्या काळात 86 हजार कोटी उत्त्पन्न होते. आज त्यांचे उत्पन्न 18 पटीने वाढून 12 लाख कोटी इतके झाले आहे. देशातील चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवणाऱ्यांना मागे ईडी, सीबीआयच्या गुन्ह्यात तुरुंगात डांबले जात आहे. या सर्व चुकीच्या गोष्टींच्या विरोधात रस्त्यांवर उतरण्याची गरज आहे.
#AndheriBypollElection : अंधेरी पूर्वसाठी उद्या मतदान; पोटनिवडणुकीतून भाजपने…
योगेंद्र यादव म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी, गरीबी, आर्थिक विषमता या विषयाला वाचा फोडण्यासाठी आणि सर्व जाती धर्मांना एका सुत्रात बांधून भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात्रा काढल्यामुळे तुम्हाला काय फायदा असा प्रश्न लोक आम्हाला विचारत आहेत. या यात्रेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मशिदीत जाऊन मुस्लीमांशी चर्चा करत आहेत तर सरकार्यवाह देशातील गरीबी आणि आर्थिक विषमतेवर आपले मत प्रकट करत आहेत, हेच भारत जोडो यात्रेचे यश आहे, असे ते म्हणाले.





