मोदी शेतकऱ्यांना नको असलेली गिफ्ट थोपवत आहेत – योगेंद्र यादव

नवी दिल्ली – जे कायदे शेतकऱ्यांनी कधी मागितलेच नव्हते ते कायदे शेतकऱ्यांवर थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप या आंदोलनातील एक नेते योगेंद्र यादव यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांना नको असलेली गिफ्ट त्यांच्यावर थोपवण्याचा हा प्रयत्न पंतप्रधानाकडून केला जात आहे असे त्यांनी सांगितले.
आज त्यांनी जयपुर-दिल्ली रस्त्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घेतला. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या मागण्यांची माहिती करून न घेताच केंद्राचे प्रतिनिधी शेतकऱ्यांबरोबर चर्चेला बसत असल्याने त्यांना हा प्रश्नच समजलेला नाही आणि त्यामुळेच शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची प्रक्रिया थांबली आहे असा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्यातच शेतकऱ्यांचे हित असून जो पर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत तो पर्यंत शेतकरी मागे हटणार नाहींत असेही त्यांनी यावेळी पुन्हा बजावले.
दिल्ली-जयपुर रोड सरकारने आणि पोलिसांनी बंद केला आहे. राजस्थानातून आलेले शेतकरी दिल्लीत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना रोखण्यासाठीच सरकारन हा रस्ता बॅरिकेट लाऊन बंद केला आहे असा आरोपहीं त्यांनी केला.





