“मोठे मोदी (नरेंद्र मोदी) आणि छोटे मोदी (अरविंद केजरीवाल) यांचा पर्याय देशासाठी अयोग्य”

नवी दिल्ली – मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्यावरही केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा स्वर बदललेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांनी आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दीड दमडीचा माणूस म्हटले आहे, तर शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे श्वानांशी तुलना केली आहे. त्याबाबत एका वाहिनीशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते योगंद्र यादव म्हणाले की हा मिश्रा यांचा बिघडलेला स्वर आहे.
दरम्यान, दिल्लीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीत सुरू असलेल्या युध्दावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. मोठे मोदी (नरेंद्र मोदी) आणि छोटे मोदी (अरविंद केजरीवाल) यांचा पर्याय देशासाठी चांगला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मिश्रा यांच्याबाबत काही बोलून मी माझे तोंड घाण करू इच्छित नाही. मात्र त्यांच्या विरोधात अनेक एफआयआर आहेत. शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाचा सामना करावा लागला. याला जनतेचा विजय असे पाहावे लागले असे नमूद करत यादव यांनी दिल्लीतील संघर्षाबद्दलही यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की आम आदमी पक्षाला त्रास दिला जातो आहे याबाबत दुमत नाही.
नायब राज्यपाल केंद्र सरकारचे एजंट असल्यासारखे काम करत आहेत. मात्र मद्दय धोरणावरून आपवरही आरोप आहेत. आपल्या स्वराज अभियाननेही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची उत्तरे अजुन मिळाली नाहीत. आपच्या सरकारने दारूचे धोरण का बदलले याचे उत्तर तर त्यांना द्यावे लागेल ना.
माझ्या मनातही त्याबाबत शंका आहेत. काही आश्वासने देऊन जो पक्ष सत्तेत आला होता, त्या पक्षाला आता उत्तरे द्यावी लागतील. मोठे मोदी आणि छोटे मोदी यांचा पर्याय या देशासाठी उपयुक्त नाही असे त्यांनी केजरीवाल यांचे नाव न घेता स्पष्ट केले.





