Nagar | भानुदास कोतकर यांच्यामुळेच बाजार समितीचा राज्यात नावलौकिक

नगर, (प्रतिनिधी) – नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. पारदर्शी कारभार करुन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग १५ वर्ष एकहाती सत्ता मतदारांनी दिली आहे. तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळविला आहे.
काही कारणांमुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती, परंतु आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाणार असल्याचे, प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.
तसेच नेप्ती उपबाजार समितीचा सात एकर जागेत विस्तार करण्यासाठी तसेच सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय लवकर घ्याण्यासाठी माजी खासदार विखे यांनी पुढाकार घ्यावा, असे ही ते म्हणाले.
कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीचे नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर नामकरण समारंभ सोहळा गुरुवारी पार पडला.
यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार अरुण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार आण्णासाहेब माने, उद्योजक मंगलदास बांदल, सचिन कोतकर, संचालिका सुरेखा कोतकर,
माजी उपहापौर सुवर्णा कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, विलास शिंदे, रावसाहेब शेळके, अविनाश घुले, सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, केडगावकर उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, माजी सभापती भानुदास कोतकर यांचे केडगाव व बाजार समितीच्या विकासात मोठे योगदान आहे. भव्य इमारत उभी करत वैभव मिळवून दिले. पाणी योजना आणली. केडगावची वेगळी ओळख तयार केली.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करा : कोतकर
बाजार समिती शेतकऱ्यांचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा आहे. शेतकरी टिकला तर व्यापारी टिकेल, व्यापारी टिकला तर बाजार समिती टिकेल. यात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. नगरमधील शेतकऱ्यांचा माल पुणे, नाशिकला का जातो याचे कारण संचालक मंडळाने शोधले पाहिजे.
फक्त नाव देऊन फायदा नाही, तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तरच माझ्या नावाचे सार्थक होईले असे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी म्हटले. मी जरी पुण्याला असलो तरी माझे बाजार समितीमध्ये काय चालते याकडे बारीक लक्ष आहे. बाजार समितीच्या संचालक, सचिव, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीतील आवक घटली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पुणे, नाशिकला शेतीमाल विक्रीसाठी नेला जात आहे. याची मी सरदवाडीमध्ये गाड्या थांबवून चौकशी केली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करा.




