Pune news : बाजार समिती उपसभापती पदी शशिकांत गायकवाड बिनविरोध
पुणे – पुणे बाजार समितीच्या उपसभापती पदी शशिकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी (दि.६) झालेल्या निवडणूकीत गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला. निवडीनंतर बाजार समिती परिसरात गायकवाड यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष केला.
जिल्हा निंबधक प्रकाश जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले. त्यावेळी सभापती प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मावळते उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांनी २८ जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक लागली आहे. यापूर्वी ७ जुलै रोजी दिलीप काळभोर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर १८ जुलै रोजी प्रकाश जगताप यांची सभापती पदी निवड झाली आहे. सभापतीनंतर आता उपसभापती निवड झाली आहे. थोडक्यात, बाजार समितीला नवीन कारभारी मिळाले आहेत.





