Pune : बाजार समिती चाैकशीची शरद पवारांकडून मागणी

पुणे – पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. गैरकारभाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी यापूर्वी पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराची चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप चौकशी न झाल्याने आता थेट शरद पवार यांनीच पत्र दिले आहे. त्यामुळे आता तरी संचालक मंडळाची कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन सचिव व प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी बाजार समिती संचालकांच्या गैरकारभाराचा विषय वेळोवेळी उघडकीस आणला आहे. त्यांच्या कारभाराबाबत विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या लेखी तक्रारी पणन संचालक यांच्याकडे सादर केलेल्या आहेत.
यातून पणन संचालकांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली, त्यामध्ये ४० पेक्षा अधिक बाबींची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. तर विधी मंडळात पणनमंत्री जयकुमार रावल यांनीही चौकशी करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप चौकशी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कालमर्यादेमध्ये चौकशीची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. मात्र, तरीही चौकशी झालीच नाही. त्यामुळे आता शरद पवार यांनी पत्र दिले आहे.





