Israeli Airstrikes in Gaza : गाझामध्ये इस्रायलने केलेल्या माऱ्यात २० जण ठार

देर अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायलने संपूर्ण गाझा पट्ट्यात रविवारी रात्रभर केलेल्या माऱ्यात किमान २० जण ठार झाले आहेत. गाझा सिटीतल्या विस्थापितांनी ज्या शाळेत आश्रय घेतला होता, त्या शाळेवर देखील रॉकेटचा मारा झाला. त्यामध्ये ३ लहान मुले ठार झाल्याचे गाझातल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र तेथे रहात असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हा मारा करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
गाझाच्या मध्यवस्तीतल्या देर अल-बलाह शहरातल्या घरावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात किमान ८ जण ठार झाले. तर खान युनिस शहरात मध्यरात्रीनंतर झालेल्या हल्ल्यात एक दाम्पत्य मारले गेले. गाझा सिटीत एका कारवर रॉकेट पडल्याने दोघेजण ठार झाले. मात्र या इतर हल्ल्यांबाबत इस्रायलच्या सैन्यदलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान इस्रायलच्या प्रशासनाने कॅतोलिक चर्चचे नेते कार्डिनल पीअरबॅटिस्ता पिझ्झाबाला यांना ख्रिश्चन समुदायासाठी नाताळनिमित्तच्या प्रार्थनेनिमित्त गाझामधील पवित्र भूमीत जाण्याची अनुमती दिली आहे. गाझा सिटीतल्या होली फॅमिली चर्चमध्ये झालेल्या सामुदायिक प्रार्थनेसाठी डझनभर ख्रिश्चन भाविक जमा झाले होते.
ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी कालच इस्रायलकडून गाझामध्ये होत असलेल्या माऱ्यावर पुन्हा एकदा टीका केली होती. त्यानंतर लगेचच ख्रिसमसच्या प्रार्थनेसाठी कार्डिनल पिझ्झाबाला यांना परवानगी देण्यात आली होती.
येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला
येमेनमधून इस्रायलमधील तेल अविव शहरावर झालेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात किमान १६ जण जखमी झाले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनींना पाठिंबा देणाऱ्या येमेनमधील हौथींंच्या ठिकाणांवर इस्रायलने अलिकडेच क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
त्याला प्रत्युत्तर म्हणून हौथींकडून तेल अविव शहरावर हा क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे हौथींनी टेलिग्राम चॅनेलवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





