रफाहवरच्या मोहिमेसाठी इस्रायल सज्ज; रविवारच्या हवाई हल्ल्यात २२ ठार

रफाह – रफाह शहरावर मोठी लष्करी कारवाई करण्याची तयारी इस्रायलने पूर्ण केली आहे. रफाहमध्ये एकवटलेल्या पॅलेस्टिनींना तेथून बाहेर काढून लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याची इस्रायलची योजना आहे. त्यासाठी खान युनिस शहराजवळ मोठ्या संख्येने तंबू उभारण्यात आल्याचे उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या फोटोमध्ये दिसते आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलने खान युनिस शहरात ठिकठिकाणी हल्ले केले आहेत. आता रफाह शहरात कारवाई केली जाणार असल्याचे इस्रायलने पूर्वीच म्हटले होते. मात्र या शहरात हजारो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला असल्यामुळे तेथील कारवाईला आंतरराष्ट्रीय पातळीवरून विरोध होत आहे. संयुक्त राष्ट्रानेही इस्रायलला रफाहवर हल्ला करू नये, असे आवाहन केले आहे.
यापूर्वी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने लहान मुले मारली गेल्याचा हवाला संयुक्त राष्ट्राने दिला आहे. मात्र इस्रायल आपल्या निर्णयावर ठाम आहे. रविवारी रफाह शहराच्या दक्षिमेकडील भागात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात एकूण २२ जण ठार झाले आहेत.
दरम्यान सीरियात असलेल्या अमेच्या तळावर एक रॉकेट हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न मंगळवारी झाला.
इस्रायलला मदत केल्याबद्दल सीरिया किंवा इराकमधील अमेरिकेच्या तळांवर असे हल्ले केले गेले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या लेबेनॉन आणि येमेनमधील सशस्त्र गटांकडून हे हल्ले केले जात असतात. सोमवारी इस्रायलने लेबेनॉनच्या दक्षिणेकडील भागातल्या हिज्बुल्लाहशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील अल-अदिसा आणि अरझूनमधील हिजबुल्लाहच्या इमारतींवरही हल्ले केले. लेबनॉनच्या हद्दीतून उत्तर इस्रायलमधील आयन झेटीम भागात सुमारे ३५ रॉकेट हल्ल्यांनंतर हे हल्ले झाले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.





