Israel–Hamas war – पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास आणि इस्रायल यांनी बुधवारी युद्धविराम कराराला अंतिम रूप देण्यात अपयश आल्याबद्दल एकमेकांवर आरोप केले. दोन्ही बाजूंनी अलीकडच्या काळात युध्दविरामाच्या दिशेने प्रगती दर्शविली होती, तथापि अंतिम शिक्कामोर्तब मात्र त्यांना करता आले नाही. इस्रायलने विलगीकरण, युद्धविराम, कैद्यांचे परतणे आणि विस्थापित व्यक्तींशी संबंधित नवीन अटी ठेवल्या आहेत, ज्यामुळे करार होण्यास विलंब होत आहे. मात्र आम्ही लवचिकता दाखवत आहोत. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने सुरू करण्यात आलेली ही बोलणी गंभीर स्वरूपाची होती असे हमासने म्हटले आहे. हमासच्या दाव्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक विधान जारी केले. दहशतवादी संघटना हमास सतत खोटे बोलत आहे, यापूर्वी झालेल्या करारांना ते नकार देत आहेत आणि वाटाघाटींमध्ये अडचणी निर्माण करत आहेत. ओलिसांना परत करण्यासाठी इस्रायलचे अथक प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने 14 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युध्दात उत्तर गाझा पट्टीवर दबाव कायम ठेवला आहे. बीट लाहिया, बीट हानौन आणि जबलिया येथील जवळपास तीन रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. बुधवारी गाझामध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यात किमान 24 लोक ठार झाले आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.