Israel Gaza War : गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 जणांचा मृत्यू; पुन्हा सुरू झाले युद्ध …

Israel Gaza War : युद्ध संपल्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाझामधील अल नुसिरतमध्ये एका शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये शाळा पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसत आहे. तेथे उपस्थित असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आपले निवेदन जारी केले आहे.
इस्रायलने असा युक्तिवाद केला आहे की, त्यांनी दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे, पण त्या शाळेत महिला आणि मुले असल्याचे समोर आले आहे. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीने याबाबत व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करताना दाखवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शाळा विस्थापित लोकांसाठी सुरक्षित मानली जात असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. इथे हल्ला व्हायला नको होता. आम्ही तिथे खेळणाऱ्या मुलांचे मृतदेह पाहिले आहेत. त्याचवेळी इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांनी दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे.
अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला होता, तरीही केला हल्ला…
गाझा युद्ध संपवण्याच्या उद्देशाने हमासने अमेरिकेचा करार स्वीकारला होता आणि इस्रायली ओलीस सोडण्यासाठीची चर्चा सुरू केली होती. रॉयटर्सने आपल्या वृत्तात लिहिले होते की, हमासने अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला असून इस्त्रायली बंधकांच्या सुटकेसाठी चर्चा सुरू आहे, मात्र याचदरम्यान इस्रायलने हल्ला केला, त्यामुळे सीजफायरचे(युद्धबंदी) उल्लघंन होण्याची भीती पुन्हा वाढली आहे.
सतत होताएत निदर्शने…
इस्त्रायली हल्ल्यांविरोधात जगभर निदर्शनेही होत आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मान आणि ब्रिटनची राजधानी लंडनमध्येही निदर्शने सुरू आहेत. अम्मानमधील हजारो लोकांनी त्यांच्या सरकारकडे इस्रायलसोबतचा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी ओलिसांच्या सुटकेसाठी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीव येथे एकत्र जमलेल्या लोकांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी त्यांची निदर्शने उधळून लावली.





