Israel-Gaza war : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये तब्बल ४९ ठार

Israel-Gaza war – इस्रायली हल्ल्यात गाझामध्ये किमान ४९ लोक ठार झाले, असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेला हा मारा शनिवार सकाळपर्यंत सुरू होता.
गाझा सिटीमधील पॅलेस्टिनीयन स्टेडियमजवळ झालेल्या दुसऱ्या एका माऱ्यात किमान १२ जण ठार झाले आहेत. या स्टेडियममध्ये इस्रायली माऱ्यापासून वाचण्यासाठी पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता. जवळच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे अन्य ८ जण देखील या हल्ल्यात मारले गेले, असे रुग्णालयांच्या सूत्रांनी सांगितले.
इस्रायल आणि हमासमध्ये पुढील आठवड्यात युद्धबंदी होण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली असतानाच हा हल्ला झाला आहे. गाझामधील स्थितीचा आढावा आम्ही घेत आहोत आणि तेथील लोकांची काळजी घेतली जावी, असा प्रयत्नही करत आहोत, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
युद्धबंदी, इराण आणि अन्य विषयांबाबत चर्चा करण्यासाठी इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डेरमर हे पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला जाणार आहेत. इस्रायलने मार्च महिन्यात युद्धबंदी मोडून पुन्हा हल्ल्यांना सुरुवात केली, तेंव्हापासून युद्धबंदीबाबतच्या वाटाघाटी रखडल्या आहेत. तेंव्हापासून इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईमध्ये शेकडो पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
इस्रायलचे ५० नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात असून त्यापैकी निम्मे जिवंत असल्याचा अंदाज आहे. इस्रायल आणि हमासमधील युद्धात आतापर्यंत ५६ हजार पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. ट्रम्प यांनी इस्रायल-इराणमध्ये युद्धबंदी घडवून आणल्यामुळे आता इस्रायल-हमासमध्ये देखील युद्धबंदी होण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.





