Israel-Gaza war : गाझामध्ये इस्रायलच्या माऱ्यात एकाच कुटुंबातील ८ जण ठार

Israel-Gaza war : इस्रायलने गाझा पट्ट्याच्या मधयवर्ती भागात केलेल्या माऱ्यामध्ये एका कुटुंबातील ८ जण ठार झाले आहेत, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
इस्रायली सैन्याने दहशतवाद्यांविरुद्धचा आपला लढा अधिक तीव्र केला असून उत्तरेकडील हजारो पॅलेस्टिनींना पुन्हा एकदा तातडीने तेथून निघून जाण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायलने लेबेनॉनमधील ज्बुल्लाहविरुद्ध हवाई आणि पायदळाचे हल्ले देखील तीव्र केले आहेत. याशिवाय इराणने या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इराणवरही इस्रायलचा हल्ला होऊ शकतो.
मात्र इराणला कधी णि कसे प्रत्युत्तर दिले जाईल, हे इस्रायलने स्पष्ट केलेले नाही.शनिवारी संध्याकाळी इस्रायलने गाझातल्या नुसरत रेफ्युजी कॅम्पमधील एका घरावर केलेल्या माऱ्यामध्ये एक दाम्पत्य आणि त्यांची ६ मुले असे एकूण ८ जण ठार झाले, असे अल अक्सा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
याशिवाय दोन महिला आणि एका बालकासह अन्य ७ जण जखमी झाले. हमास आणि अन्य सशस्त्र दहशतवादी गटांचे दहशतवादी दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये लपून बसले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अवघड होते आहे.
मात्र ती कारवाई अनिवार्य असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. हमासविरुद्धच्या या कारवाईचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये असा प्रयत्न असल्याचेही इस्रायली सैन्याने म्हटले आहे.
इस्रायलने यापूर्वी गाझामधील शाळा आणि छावण्यांवरही अशा प्रकारे मारा केला होता. एखाद्या हल्ल्याबाबत इस्रायलकडून क्वचितच अशी प्रतिक्रिया दिली जात असते.





