Russia Ukraine War : पीएम मोदी रशियाला पोहोचण्यापूर्वी रशियन सैन्याकडून युक्रेनवर 40 हून अधिक क्षेपणास्त्राचे हल्ले…

Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी अमेरिकेत नाटोची बैठक सुरू आहे. अशा परिस्थितीत रशियाने युक्रेनच्या 5 शहरांवर 40 हून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, ज्यामुळे युक्रेनला मोठा फटका बसला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याला दुजोरा दिला आहे.
याआधी अशी बातमी समोर आली होती की, मागील 24 तासांत रशियाने युक्रेनवर 55 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले होते, ज्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि 40 हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील देश सातत्याने प्रयत्न करत आहेत.
यूक्रेनवर 27 ड्रोननी केले हल्ले…
बदला घेण्यासाठी दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. युक्रेनच्या जनरल स्टाफने सांगितले की, शनिवारी युक्रेन आणि रशियाच्या सैन्यांमध्ये 45 चकमकी झाल्या. रशियन सैनिक येथे ड्रोनने पाण्याच्या टाक्यांवर हल्ला करताना दिसले. युक्रेनने सांगितले की, त्यांनी 27 पैकी 24 रशियन ड्रोन पाडले. देशात सर्वाधिक नुकसान पूर्वेकडील भागात झाले आहे. त्याच वेळी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी पूर्व युक्रेनमधील 30 किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतला आहे.
पंतप्रधान मोदी रशिया अन् ऑस्ट्रिया दौऱ्यावर ; पाश्चात्य देशांची चिंता वाढली
किंजल हायपरसॉनिक मिसाईलने केला हल्ला…
त्याच वेळी, युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रशियन सैन्याने सोमवारी युक्रेनच्या अनेक ठिकाणावर बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. राजधानी कीवमध्ये स्फोटाचे धक्के जाणवले. शहराच्या विविध भागातून धुराचे लोट उठताना दिसत होते. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. या हल्ल्यात किंजल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले, जे रशियाच्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक आहे. किंजल ध्वनीच्या गतीपेक्षा 10 पट वेगाने उडते, ज्यामुळे त्या क्षेपणास्त्राला थांबवणे कठीण जाते.





